job.timesofmarathi.com

माझी कन्या भाग्यश्री योजना

Spread the love

वंशाला वारस म्हणून मुलगा हवा, मुलगी नको असा दुराग्रह धरण्याची अनेक पालकांची वृत्ती आढळून येते. मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी झाल्यांमुळे संपूर्ण समाजातील लोकसंख्येचा आणि निसर्गाचा समतोल ढळत आहे. समाजात मुलींना जन्माला येऊ न देण्याच्या किंवा जन्माला आल्यावर त्यांच्याशी भेदभाव करण्याची मानसिकता अनेक ठिकाणी दिसून येते. त्यातून विषमतावादी अनिष्ट प्रथा निर्माण होतात. त्यांना आळा घालण्यासाठी वेळोवेळी राज्य शासनातर्फे उपाययोजना सुरू करण्यात आल्या. त्यातून मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी पूर्वीची सुकन्या समृद्धी योजना माझी कन्या भाग्यश्री या योजनेत विलीन करण्यात आली आहे.

मुलींचा जन्मदर वाढविणे, लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे, मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढविणे, यासाठी माझी कन्या भाग्यश्री ही योजना दिनांक 1 एप्रिल 2016 पासून लागू करण्यात आलेली आहे. ही योजना दारिद्र्यरेषेखालील सर्व कुटुंबात जन्माला येणाऱ्या दोन अपत्य मुलींसाठी लागू आहे. दारिद्र्य रेषेवरील म्हणजेच एपीएल कुटुंबात जन्माला येणाऱ्या मुलींसाठी या योजनेतील काही लाभ देण्यात येणार आहेत. या योजनेची अंमलबजावणी आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई यांच्याकडून करण्यात येत आहे.

मुलींचा जन्मदर वाढविणे, त्यांना शिक्षण देणे व बालविवाहास प्रतिबंध करण्यासाठी 1 एप्रिल 2014 पासून सुरू असलेली सुकन्या समृद्धी योजना ही माझी कन्या भाग्यश्री या नवीन योजनेत विलीन करण्यात आली आहे. ही नवीन योजना दिनांक 1 एप्रिल 2016 पासून सुरू करण्यात आली आहे. सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत राज्यातील दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) कुटुंबात जन्मणाऱ्या पहिल्या दोन मुली अपत्याच्या नावे 21 हजार 200 रूपये एवढी रक्कम मुलीच्या जन्माच्या एक वर्षाच्या आत, आयुर्विमा महामंडळाच्या योजनेत गुंतवून, लाभार्थी मुलीस वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर, एकूण 1 लाख रूपये एवढी रक्कम, विहित अटी व शर्तीच्या पूर्ततेनंतर प्रदान करण्याची तरतूद होती. सुकन्या समृद्धी योजनेतील दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) गटासाठी देण्यात आलेले सर्व लाभ माझी कन्या भाग्यश्री या योजनेत कायम ठेऊन हे लाभ समाजातील दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) तसेच एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या दारिद्र्यरेषेवरील (एपीएल) गटासाठीही लागू करण्यात आले आहेत. माझी कन्या भाग्यश्री या योजनेमध्ये लाभार्थीला आयुर्विम्याचा लाभ, आम आदमी विमा योजनेंतर्गत लाभ व प्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत लाभ असे मुख्य लाभ अनुज्ञेय राहतील.

मुलीच्या नावावर शासनामार्फत आयुर्विमा महामंडळाकडे 21 हजार 200 रूपयांचा विमा उतरविण्यात येईल. तसेच मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर 1 लाख रूपये विम्याची रक्कम, विहित अटी व शर्तीच्या पूर्ततेनंतर देण्यात येईल. या रकमेपैकी 10 हजार रूपये एवढी रक्कम मुलीच्या कौशल्य विकास / उच्च शिक्षण अथवा स्वयंरोजगार मिळविण्यासाठी खर्च करावे लागतात.

आम आदमी विमा योजनेचा लाभ

आम आदमी विमा योजनेंतर्गत, लाभार्थी मुलीचे पालक, ग्रामीण भागातील भूमिहीन कुटुंबातील 18-59 वयोगटातील रोजगार करणारा कुटुंब प्रमुख किंवा त्या कुटुंबातील एक मिळवता व्यक्ती असल्यास आणि अशा व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास या योजनेंतर्गत अनुज्ञेय लाभ देय राहतील. आयुर्विमा महामंडळामार्फत राबविल्या जाणाऱ्या केंद्र शासनाच्या आम आदमी योजनेंतर्गत सदर मुलीच्या नावे जमा केलेल्या रक्कमेतून (Corpus रू. 2100/-) नाममात्र 100 रूपये प्रतिवर्षी इतका हप्ता जमा करून मुलीच्या कमावत्या पालकाचा विमा उतरवला जाईल. यात मुलीच्या पालकाचा अपघात / मृत्यू झाल्यास पुढीलप्रमाणे लाभ अनुज्ञेय राहील. नैसर्गिक मृत्यू 30 हजार रूपये, अपघातामुळे मृत्यू 75 हजार रूपये, दोन डोळे अथवा दोन अवयव अपघातामुळे निकामी झाल्यास 37 हजार 500 रूपये.

प्रधानमंत्री जनधन योजना

या योजनेंतर्गत लाभार्थी मुलगी व तिची आई यांचे नावे संयुक्त बचत खाते (नो फ्रील खाते) राष्ट्रीयकृत बँकेत उघडण्यात येईल. त्यामुळे या योजनेंतर्गत 1 लाख रूपये अपघात विमा व 5 हजार रूपये ओव्हरड्राफ्ट व इतर अनुज्ञेय लाभ घेता येतील. माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत अनुज्ञेय लाभ लाभार्थींच्या प्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत बँक बचत खात्यात देण्यात येईल. हे खाते उघडण्यास अंगणवाडी सेविका/मुख्य सेविका/पर्यवेक्षिका या अर्जदारास मदत करतील.

मुख्य लाभाच्या योजनांबाबत सर्वसाधारण सूचना

एल.आय.सी. योजनेचा अर्ज जरी बालिकेच्या जन्माच्या वेळेस देण्यात आला असला तरी या योजनेचा प्रत्यक्ष लाभ बालिका 18 वर्षांची झाल्यावरच मिळणार असल्याने या योजनेसाठीचा अर्ज स्वीकारल्यानंतर त्या बालिकेचे योग्यवेळी ओळखपत्र, आधार कार्ड, बँक खाते इत्यादी अधिकृत दस्तावेज काढण्यास त्या त्या प्रकल्पाच्या मुख्य सेविकेने लाभार्थी बालिकेस व तिच्या पालकांस मदत करावी, म्हणजे बालिकेचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यावर तिला या योजनेचा लाभ तात्काळ मिळविणे सोईचे होईल.

एकूणच अशा योजनांमुळे मुलीच्या जन्माचे स्वागत केले जाईल, अशी अपेक्षा आहे. त्याचबरोबर पालकांनाही प्रोत्साहन मिळण्याबरोबरच मुलीच्या भविष्याची सुरक्षित तरतूद होईल


Spread the love